वडगाव मावळ:ता.15(दैनिक साम्राज्य न्यूज ):गावाचा सरपंच हा माणसे ओळखणारा पाहिजे; परंतु बऱ्याचदा सरपंच झाल्यानंतर व्यक्तीचा मानवी स्वभाव आणि विकासाचे धोरण विसरून जातात.हा आजचा मोठा मानसिक प्रॉब्लेम आहे. सरपंचाने गावामध्ये कडक वातावरण ठेवले, तरच खऱ्या अर्थाने गावाचा विकास होऊ शकतो,” असे प्रतिपादन पाटोदा गावचे माजी आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी केले.
मावळ विचार मंच आयोजित २६व्या ‘सरस्वती व्याख्यानमाले’त चौथे पुष्प गुंफताना ते बोलत होते. ‘आपला विकास आपल्या हाती’ या विषयावर मार्गदर्शन करताना त्यांनी ग्रामविकासाचा मंत्र दिला.पुढे बोलताना पेरे पाटील म्हणाले की, शेतकरी आणि खेड्यांचा विकास झाल्याशिवाय देश कधीही महासत्ता होणार नाही. यासाठी शेतकऱ्यांना २५ टक्के सबसिडी देणारे आपले गाव देशात पहिले असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. "शेतकरी जगला तरच अन्नधान्य खायला मिळणार आहे," असे सांगत गावाला गरज पडेल त्या सर्व सुविधा ग्रामपंचायतीने पुरवल्या पाहिजेत असे स्पष्ट केले.
व्याख्यानमालेत मावळचे खासदार श्रीरंग बारणे व नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांनी 'मावळ विचार मंच'च्या उपक्रमाबद्दल कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमप्रसंगी अध्यक्षस्थानी मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे होते. याप्रसंगी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगराध्यक्ष संतोष दाभाडे, पंचायत समितीचे माजी उपसभापती शांताराम कदम, मावळ विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर, कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य आणि अध्यक्ष अरुण वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल म्हाळसकर यांनी केले, सन्मानपत्र वाचन वैशाली ढोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संतोष चव्हाण यांनी केले.
बातम्या जाहिरातीसाठी संपर्क -9850338185


